हेळगावचे १७ पर्यटक सुखरूप   

सातारा,(प्रतिनिधी) : पहेलगाम येथील बैसरण घाटी परिसरात लष्करी गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर मंगळवारी हल्ला केला. या हल्ल्याच्या घटनेपासून केवळ एक ते दोन कि.मी.वर असलेल्या सातारा जिल्ह्यातील सुमारे १७ पर्यटक सुखरूप असल्याचे थेट काश्मीरमधून भरत सूर्यवंशी यांनी दूरध्वनीवरून सांगितले. या हल्ल्याच्या ठिकाणाहून जवळच असणारी चंदनवरी व्हॅली पाहत असलेले महाराष्ट्रातील १७ पर्यटक तेथून सुरक्षित ठिकाणी आले असल्याचे सांगत त्यांनी त्या घटनेचा थरारक अनुभव सांगितला. आणि केवळ दैव बलवत्तर म्हणूनच आम्ही बचावलो मात्र पर्यटकावर झालेल्या हल्ल्याबाबत त्यांनी दुःख व्यक्त केले. मंगळवारी २२ तारखेला आम्ही पेहलगाममधील ज्या ठिकाणी हल्ला झाला, ती बैसरण घाटी बघून अर्ध्या तासानंतर,  अरू व्हॅली बघितली नंतर चंदनवरी व्हॅली पाहात होतो, तेव्हा दहशतवादी हल्ला झाल्याचे समजले. तो आमच्या पासून केवळ २ किलोमीटर अंतरावर झाला. पण लगेच १० मिनिटामध्ये आर्मीचे ४ हेलिकॉप्टर आले आणि त्यांनी सर्च ऑपरेशन चालू केले.
 
आर्मीच्या ७० ते ८० गाड्या आल्या, एवढा मोठा भाग काही क्षणात ताब्यात घेतला. आयुष्यात आपण नेहमी अनेक घटना पाहत असतो पण या घटनेचा अनुभव काळजात धस्स करून गेला. आपल्या देशाची संरक्षण यंत्रणा कशी सतर्क आहे हे केवळ दहा मिनिटाच्या वेळातच आम्हाला समजले. आम्ही कराड तालुक्यातील हेळगाव या गावातील १७ जण तातडीने तेथून निघालो. मात्र पण हा सगळा अनुभव बघून सर्वांच्याच अंगावर काटा आला. आम्ही हेळगाव येथील चार कुटुंबातील सुमारे १७जण तातडीने श्रीनगरकडे रवाना झालो आणि श्रीनगरमध्ये सुरक्षित पोहोचलो असल्याचे त्यांनी सांगितले.
 

Related Articles